
Image Source:(Internet)
नागपूर : नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. राजीव पोतदार यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे महसूल मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने डॉ. राजीव पोतदार यांच्या नावाला मंजुरी देत त्यांना नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार घोषित केले आहे.
नामांकन प्रक्रियेदरम्यान भाजपच्या संघटनात्मक ताकदीचे आणि एकजुटीचे दर्शन घडले. पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी डॉ. पोतदार यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र दिसून आले.
येत्या १८ जून रोजी होणाऱ्या या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये या निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपने डॉ. पोतदार यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात दमदार दावेदारी सादर केल्याचे मानले जात आहे.