विधान परिषदेत आरपीआयलाही संधी द्या; रामदास आठवलेंची मागणी

    01-Jun-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे : महायुतीतील सहयोगी पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आरपीआय) विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आगामी काळात रिक्त होणाऱ्या पाच जागांपैकी एक जागा आरपीआयच्या वाट्याला यावी, अशी मागणी त्यांनी केली.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले की, आरपीआयला विधान परिषदेत स्थान देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सकारात्मक आश्वासन दिले होते. त्यामुळे पुढील निवडणुकीत पक्षाला संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

ते म्हणाले की, पक्षाचे संख्याबळ मर्यादित असल्याने यावेळी उमेदवारीसाठी औपचारिक दावा करण्यात आलेला नसला, तरी महायुतीचा घटक पक्ष म्हणून आरपीआयच्या योगदानाची दखल घेणे आवश्यक आहे. विधान परिषदेतील जागेसोबतच दोन शासकीय महामंडळांवर पक्षाला प्रतिनिधित्व मिळावे, अशीही मागणी त्यांनी केली.

महायुतीतील सर्व पक्षांनी सहयोगी पक्षांचा सन्मान राखला पाहिजे. सत्तेतील सहभाग आणि जबाबदाऱ्या यामध्ये आरपीआयला योग्य स्थान मिळावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आठवले यांनी २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेनंतर अनुसूचित जातींना त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी केली. तसेच मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करत संवादाच्या माध्यमातून प्रश्न सुटावेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.