
Image Source:(Internet)
मुंबई : जून महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून बँकिंग क्षेत्रात काही महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. विशेषतः क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लाखो ग्राहकांवर या नव्या नियमांचा थेट परिणाम होणार आहे. विविध बँकांनी रिवॉर्ड पॉइंट्स, व्यवहार शुल्क, व्याजदर आणि अलर्ट सेवांमध्ये बदल जाहीर केले असून ग्राहकांनी हे नियम जाणून घेणे आवश्यक ठरणार आहे.
क्रेडिट कार्डद्वारे होणाऱ्या दैनंदिन व्यवहारांवर मिळणारे लाभ, आकारले जाणारे शुल्क आणि बँकांकडून मिळणाऱ्या सुविधा यामध्ये बदल झाल्याने खर्चाचे नियोजन करताना ग्राहकांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे.
रिवॉर्ड पॉइंट्सवर मर्यादा-
कोटक महिंद्रा बँकेने १ जूनपासून आपल्या विविध क्रेडिट कार्डसाठी नवीन नियम लागू केले आहेत. युटिलिटी बिल, इंधन, भाडे आणि विमा प्रीमियम भरण्यावर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइंट्सवर मर्यादा घालण्यात आली आहे. तसेच जमा झालेल्या रिवॉर्ड पॉइंट्सचे रिडेम्प्शन मूल्यही कमी करण्यात आले आहे.
भाडे आणि शैक्षणिक शुल्कावर अतिरिक्त शुल्क-
कोटक महिंद्रा बँकेच्या कार्डद्वारे भाडे किंवा शैक्षणिक शुल्क भरताना आता १ टक्का व्यवहार शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय युटिलिटी पेमेंट, वॉलेट लोडिंग, ऑनलाइन गेमिंग आणि इंधन व्यवहारांमध्ये ठरावीक मर्यादा ओलांडल्यानंतर अतिरिक्त १ टक्का शुल्क लागू होणार आहे.
व्याजदरात वाढ-
बँक ऑफ बडोदाने आपल्या सह-ब्रँडेड क्रेडिट कार्डवरील थकीत रकमेच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २३ जूनपासून मासिक व्याजदर ३.४९ टक्क्यांवरून ३.७५ टक्के होणार आहे. त्यामुळे थकीत रक्कम वेळेत न भरल्यास ग्राहकांवर अधिक आर्थिक भार पडू शकतो.
Amazon Pay कार्डधारकांना झटका-
आयसीआयसीआय बँकेने १८ जूनपासून Amazon Pay क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यावर मिळणारा १ टक्का रिवॉर्ड पॉइंट्सचा लाभ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना आता कमी फायदा मिळणार आहे.
SMS अलर्ट नियमांमध्ये बदल-
एचडीएफसी बँकेनेही अलर्ट सेवेत बदल जाहीर केले आहेत. २५ जूनपासून लहान रकमेच्या व्यवहारांसाठी एसएमएस सूचना पाठविणे बंद केले जाणार आहे. पैसे पाठवताना १०० रुपयांपेक्षा जास्त आणि पैसे मिळाल्यास ५०० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठीच एसएमएस अलर्ट मिळणार आहेत. मात्र सर्व व्यवहारांची माहिती ई-मेलद्वारे उपलब्ध राहणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, ग्राहकांनी आपल्या क्रेडिट कार्डशी संबंधित अटी, शुल्क आणि रिवॉर्ड पॉलिसी नियमितपणे तपासणे गरजेचे आहे. तसेच अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी आणि उपलब्ध लाभांचा पूर्ण फायदा घेण्यासाठी थकीत रक्कम वेळेत भरणे महत्त्वाचे ठरणार आहे.