राज्यात पावसाचे सावट कायम; यवतमाळ-चंद्रपूरसह विदर्भात ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    09-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : राज्यात सध्या हवामानाने दुहेरी रूप धारण केले असून काही भागांत उकाड्याचा त्रास तर काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने विदर्भातील यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही वादळी पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दुसरीकडे कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी भागांत उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यातील तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. वाशीम आणि जळगाव येथे ४२.६ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी तापमान नोंदले गेले. ब्रह्मपुरी, मालेगाव आणि भंडारा येथेही पारा ४१ अंशांवर गेला आहे. सोलापूर, परभणी, अकोला, वर्धा आणि धाराशिव जिल्ह्यांतही उष्णतेची तीव्रता कायम आहे.

तर दुसरीकडे थंड हवामानाचे चित्र महाबळेश्वरमध्ये पाहायला मिळाले असून येथे १८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.

राज्यातील बदलत्या हवामानामुळे आरोग्य आणि शेती दोन्हीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.