पिंपरी-चिंचवड हादरले; चार चिमुरड्यांवर अत्याचाराचा प्रयत्न, सोसायटीचा सुरक्षारक्षक अटकेत!

    09-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे: जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या चार अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीचा सुरक्षारक्षक असलेल्या आरोपीने शुक्रवारी दुपारी ६ ते १० वर्षे वयोगटातील चार मुलींना “टेरेसवर पाण्याची टाकी दाखवतो” असे सांगून सातव्या मजल्यावर नेले. तेथे त्याने त्यांच्याशी गैरवर्तन करत अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

या दरम्यान आरोपीने कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे. मात्र, घाबरलेल्या मुलींमध्ये एका १० वर्षांच्या मुलीने धैर्य दाखवत घरी पोहोचताच आईला संपूर्ण प्रकार सांगितला.

यानंतर पालकांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी सुरक्षारक्षकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून सोसायटीच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.