आळंदीत राष्ट्रवादी प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; संग्राम भंडारे व साथीदारांवर गंभीर आरोप

    09-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

आळंदी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक आणि मारहाणीचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. किर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या काही साथीदारांनी लवांडे यांना आळंदी परिसरात अडवून हा प्रकार केल्याचा आरोप लवांडे यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दशक्रिया कार्यक्रमानंतर प्रवचन आटोपून लवांडे पुण्याच्या दिशेने निघाले असताना काही जणांनी त्यांचा पाठलाग करत निर्जनस्थळी त्यांची गाडी अडवली. यावेळी त्यांना खाली उतरवून अंगावर शाईच्या बाटल्या फेकण्यात आल्या, तसेच धक्काबुक्कीही झाल्याचा दावा लवांडे यांनी केला आहे. या घटनेदरम्यान काही जणांकडे शस्त्र असल्याचा आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाले. या प्रकारानंतर लवांडे यांनी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आरोपींवर कठोर कारवाई करून लवांडे यांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरी आणि कट्टरतावादावरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा तापला असून, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.