Image Source:(Internet)
नाशिक : टीसीएस कंपनीशी संबंधित अत्याचार आणि कथित बेकायदा धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला (Nida Khan) अखेर पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल २५ दिवसांपासून ती फरार होती. छत्रपती संभाजीनगर येथे लपून बसलेल्या निदा खानला नाशिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले.
माहितीनुसार, निदा खानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नाशिक पोलिसांची दोन विशेष पथके कार्यरत होती. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तिचा ठावठिकाणा शोधून काढला. अटकेनंतर पुढील चौकशीसाठी तिला नाशिकमध्ये आणण्यात आले आहे.
निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कैसर कॉलनीतील एका सदनिकेत कुटुंबासह राहत असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्यासोबत आई-वडील, भाऊ आणि मावशी असे पाच जण वास्तव्यास होते.
अटक टाळण्यासाठी गर्भवती असल्याचा दावा
पोलिस तपासापासून बचाव करण्यासाठी निदा खानने आपण गर्भवती असल्याचे सांगत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळून लावला.
या प्रकरणात पीडित महिलेला बुरखा, धार्मिक साहित्य देणे तसेच तिच्या भ्रमणध्वनीमध्ये धार्मिक ॲप्स स्थापित केल्याचे आरोप निदा खानवर आहेत. तपासादरम्यान पीडितेची ओळख बदलून तिला मलेशियाला पाठवण्याचा कट रचला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय जाळे कार्यरत आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील दुसरा आरोपी दानिश शेख याच्या मोबाईलमधून तपास यंत्रणांना महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळाले आहेत. संशयास्पद छायाचित्रे आणि व्हिडीओंचे विश्लेषण सुरू असून, तपास अधिक खोलात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.