Image Source:(Internet)
नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल (10th result) जाहीर केला असून, नागपूर जिल्ह्याने यंदा 89.07 टक्के निकाल नोंदवला आहे. राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के असल्याने नागपूरची कामगिरी सरासरीपेक्षा काहीशी कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी हा निकाल आज अधिकृतपणे ऑनलाईन जाहीर करण्यात आला. नागपूर विभागातून हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी इतर काही विभागांच्या तुलनेत नागपूर मागे राहिल्याचे चित्र आहे.
कोकण अव्वल; नागपूरची मध्यम श्रेणीत नोंद-
राज्यात कोकण विभागाने 97.62 टक्के निकालासह अव्वल स्थान पटकावले आहे. मुंबई (94.97 टक्के) आणि कोल्हापूर (95.47 टक्के) विभागांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या तुलनेत नागपूरचा 89.07 टक्के निकाल मध्यम स्तरात गणला जात आहे.
मुलींची पुन्हा सरस कामगिरी-
राज्यभराप्रमाणेच नागपूरमध्येही मुलींनी यंदा मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. उत्तीर्ण दरात मुली आघाडीवर असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.
शाळा व विद्यार्थ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया-
निकाल जाहीर होताच नागपूर शहर आणि ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवत यश संपादन केले, तर काहींना अपेक्षित निकाल न लागल्याने नाराजीही जाणवली.एकंदरीत नागपूरचा दहावी निकाल समाधानकारक राहिला असला तरी राज्यातील आघाडीच्या विभागांच्या तुलनेत अजून सुधारण्यास वाव असल्याचे शिक्षण क्षेत्रातील निरीक्षणातून स्पष्ट होत आहे.