Image Source:(Internet)
नाशिक : शहरात गाजत असलेल्या TCS कंपनीतील हिंदू महिलांच्या कथित लैंगिक शोषण व धर्मांतर प्रकरणात आता मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर ठेवण्यात आला असून, त्यांचाही या गुन्ह्यात सहआरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या सुमारे दीड महिन्यांपासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधील कौसर पार्क परिसरात लपवून ठेवण्यात आले होते. हे घर मतीन पटेल यांनी काही महिन्यांपूर्वी खरेदी केले असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. याच ठिकाणी निदा खान तिच्या कुटुंबासह वास्तव्यास होती, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कारवाईला वेग देण्यात आला.
नाशिक पोलिसांनी ही माहिती मिळताच संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने संयुक्त पथक तयार केले. गुरुवारी रात्री परिसरात रेकी करून छापा टाकण्यात आला आणि निदा खानला ताब्यात घेण्यात आले. तिच्यासोबत आई-वडील, मावशी आणि भाऊही उपस्थित असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, मतीन पटेल यांना पोलिसांनी नोटीस बजावली असून त्यांचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तपास यंत्रणा आता त्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करत आहेत—त्यांचा सहभाग केवळ आश्रय देण्यापुरता मर्यादित होता की संपूर्ण कटात त्यांचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.
निदा खानवर TCS प्रकरणात पीडित महिलांच्या धार्मिक भावना दुखावणे आणि त्यांचा ब्रेनवॉश केल्याचा संशय आहे. देवळाली कॅम्प परिसरात तिच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. अटकेपासून बचावासाठी तिने गरोदर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून जामिनाचा प्रयत्न केला होता, मात्र नाशिकरोड न्यायालयाने तिचा जामीन फेटाळला. न्यायालयाने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या नेटवर्कशी जोडलेले असल्याचे निरीक्षण नोंदवले.
या अटकेनंतर आर्थिक व्यवहार, परकीय निधी आणि धर्मांतराशी संबंधित मोठे जाळे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय वर्तुळातही या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले असून, काही नेत्यांवर चौकशीची मागणी करण्यात येत आहे.