शरद पवार पुन्हा मैदानात; प्रकृती सुधारताच साताऱ्यातून सार्वजनिक कार्यक्रमांना सुरुवात

    07-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आजारपणातून पूर्णपणे सावरल्यानंतर पुन्हा सक्रिय झाले आहेत. राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे बारामती विधानसभा निवडणुकीतील मतदानालाही त्यांना उपस्थित राहता आले नव्हते. मात्र, आता उपचारानंतर ते ठणठणीत बरे होऊन पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पवार यांचा पहिला अधिकृत दौरा साताऱ्यात होत आहे. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते साताऱ्यात दाखल होणार आहेत. ८ मे रोजी ते साताऱ्यात मुक्कामी पोहोचतील, तर ९ मे रोजी सकाळी कर्मवीरांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करणार आहेत.

या स्मृतिदिन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही पवार भूषवणार असून, त्यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेतील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे. तसेच ‘रयत मासिक’, ‘कर्मवीर सांगाती’ आणि ‘रयत विज्ञान पत्रिका’ या प्रकाशनांचे अनावरणही त्यांच्या हस्ते होणार आहे.

याशिवाय शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

दरम्यान, साताऱ्यातील भाषणात पवार कोणते राजकीय संकेत देतात, याबाबत उत्सुकता वाढली आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर ते पुन्हा सक्रिय होत असल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.