सुनेत्रा पवारांच्या निर्णयाकडे राष्ट्रवादीत नजर; राज्यसभा, महिला आयोगासह अनेक पदांसाठी जोरदार रस्सीखेच

    07-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्यांची जोरदार चर्चा सुरू झाली असून, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचवेळी महिला आयोग, महिला प्रदेशाध्यक्ष, मुंबई अध्यक्ष आणि युवक प्रदेशाध्यक्ष अशी अनेक पदे अजूनही रिक्त असल्याने पक्षात अंतर्गत हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.

राज्यसभेच्या जागेसाठी माजी खासदार आनंद परांजपे, सुबोध मोहिते, शिवाजीराव आढळराव पाटील आणि भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले संजय काका पाटील यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय भुजबळ आणि मलिक कुटुंबीयांकडूनही दावेदारी पुढे येत असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.

पक्षातील खासदार पार्थ पवार यांच्या भूमिकेलाही महत्त्व दिले जात असून, त्यांच्या जवळचे मानले जाणारे अविनाश आदिक आणि विक्रम काकडे यांचीही नावे पुढे आली आहेत.

दरम्यान, पक्षातील इतर रिक्त पदांवरही लवकर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युवक प्रदेशाध्यक्ष पद गेल्या दहा महिन्यांपासून रिक्त आहे. माजी युवक अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी वादानंतर पदाचा राजीनामा दिल्यानंतर अद्याप नव्या अध्यक्षाची नियुक्ती झालेली नाही. तसेच मुंबई अध्यक्ष पदही बराच काळ रिक्त असून, त्या पदासाठी सध्या कार्याध्यक्ष म्हणून काम पाहणारे नेते प्रयत्न करत आहेत.

महिला प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठीही अनेक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी वैशाली नागवडे, रूपाली ठोंबरे, प्रेरणा बलकवडे, सुरेखा ठाकरे आणि राजलक्ष्मी भोसले यांची नावे चर्चेत आहेत.

महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत प्रतिभा शिंदे यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही या पदासाठी इच्छा व्यक्त केल्याची चर्चा आहे. तसेच वैशाली मोठे यांचे नावही महिला आयोगासाठी पुढे आले असून, त्यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमांवर प्रचार मोहिमाही सुरू करण्यात आल्याचे समजते.

मुंबई अध्यक्षपदासाठी सिद्धार्थ कांबळे आणि शिवाजीराव नलावडे हे दोघे आघाडीवर मानले जात आहेत. दोन्ही नेत्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे.

एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या विविध पदांसाठी इच्छुकांची चढाओढ सुरू असून, अंतिम निर्णयासाठी सर्वांचे लक्ष देवगिरी बंगल्याकडे लागले आहे. पक्षात सध्या एक म्हण पुन्हा चर्चेत आली आहे. “लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, पण पदांच्या गाठी देवगिरीवर.”