कोकणात पावसाची हजेरी, विदर्भात उष्णतेचा तडाखा; हवामान विभागाचा दोन दिवसांचा इशारा

    07-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई: राज्यात पुढील दोन दिवस हवामानाचा दुहेरी परिणाम पाहायला मिळणार आहे. एकीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, तर दुसरीकडे विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

गुरुवार (७ मे) आणि शुक्रवार (८ मे) दरम्यान कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाटमाथा, सांगली, बीड, धाराशिव, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तर कोकण-गोव्यात पुढील तीन ते चार दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो.

दुसरीकडे विदर्भात मात्र पावसाची कोणतीही शक्यता नसून हवामान कोरडे राहणार आहे. पुढील चार दिवसांत कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील अनेक भागात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पुणे आणि परिसरातही पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहणार असून तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअसदरम्यान राहू शकते. विशेषतः लोहगाव, मगरपट्टा आणि कोरेगाव पार्क परिसरात तापमानाचा पारा ४१ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारनंतर राज्यातील बहुतांश भागात हवामान पुन्हा कोरडे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.