
Image Source:(Internet)
नागपूर : महाराष्ट्रातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रस्तावित हिंदी भाषा परीक्षेला राज्य सरकारने अखेर स्थगिती दिली आहे. २८ जून रोजी होणाऱ्या या परीक्षेवरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. मराठी असताना हिंदीची सक्ती का, असा सवाल उपस्थित करत मनसे, शिवसेना ठाकरे गटासह अनेक मराठी संघटनांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.
वाढत्या विरोधानंतर सरकारने माघार घेत परीक्षा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला. याबाबत माहिती देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, मराठी भाषा संचालनालयाकडून परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, यावर निर्माण झालेला वाद लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.
उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, हिंदी भाषा परीक्षा खरंच आवश्यक आहे का, याची राज्य सरकारकडून फेरतपासणी केली जाणार आहे. मराठी भाषेच्या हिताला बाधा पोहोचणार नाही, याची काळजी घेत पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या परीक्षेला हिंदी सक्तीचा प्रयत्न असल्याचा आरोप करत तीव्र विरोध दर्शवला होता. “महाराष्ट्रात येणाऱ्यांनी मराठी शिकावी, इथल्या अधिकाऱ्यांना हिंदी शिकवण्याची गरज नाही,” असे म्हणत त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही सरकारच्या निर्णयावर टीका करत, “मराठी राज्यात हिंदी परीक्षेची गरज काय?” असा सवाल उपस्थित केला होता.