
Image Source:(Internet)
मुंबई : राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेली एक महत्त्वाची भेट गुरुवारी मुंबईत पार पडली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत असली, तरी भेटीचा नेमका अजेंडा अद्याप गुप्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आगामी राजकीय समीकरणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राज्यातील बदलत्या घडामोडींशी या भेटीचा संबंध जोडला जात आहे.
भेटीनंतर माध्यमांनी बावनकुळे यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणतेही भाष्य टाळत थेट तेथून प्रस्थान केले. त्यामुळे या भेटीभोवतीचे गूढ आणखी वाढले आहे.
दरम्यान, ‘शिवतीर्थ’वरील या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही चर्चांना उधाण आले असून, राजकीय वर्तुळाचे लक्ष आता पुढील घडामोडींवर लागले आहे.