नागपुरात तृतीयपंथीयांचा संताप; विहिप कार्यालयासमोर रात्री ठिय्या, ‘पीठाभिषेक’ रद्द करण्याची मागणी

    06-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरातील पारडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली, जेव्हा ३०० ते ४०० तृतीयपंथीयांनी विश्व हिंदू परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत हत्या प्रकरणातील आरोपीच्या प्रस्तावित ‘पीठाभिषेक’ कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवला.

तृतीयपंथीय समाजाच्या मते, २०१९ मधील चमचम गजभिये हत्याकांडातील आरोपी उत्तम बाबा नुकताच जामिनावर बाहेर आला आहे. अशा व्यक्तीचा धार्मिक विधी करून सन्मान करण्याचा प्रयत्न होत असल्याने समाजात संताप उसळला आहे. ६ मे रोजी किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर आंदोलन पेटले.

आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की, “खुनाच्या आरोपाखालील व्यक्तीचा गौरव हा आमच्या समाजाचा अपमान आहे.” कार्यक्रम रद्द न केल्यास आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलण्याची चेतावणीही त्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये पैशांच्या वादातून या हत्येची घटना घडली होती. त्या वेळीही आरोपीविरोधात तृतीयपंथीय समाजाने मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले होते. आता जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा समाजातील लोकांना धमकावत असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी विहिप पदाधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित कार्यक्रम तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन विहिपकडून देण्यात आले.

घटनेदरम्यान पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. उशिरापर्यंत परिसरात तणाव कायम असला तरी सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती समोर आली आहे.