महावितरणकडून घराघरात सौर ऊर्जेला चालना;मे 2026 ‘सौर महिना’ साजरा होणार

    06-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : केंद्र सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात मे 2026 हा ‘सौर महिना’ म्हणून साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महावितरण ने पीएम सूर्यघर मोफत वीज योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.

या मोहिमेचा मुख्य उद्देश नागरिकांच्या घरांच्या छतांवर सौर पॅनल बसवून वीज खर्च कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जेला चालना देणे हा आहे. त्यासाठी राज्यभर जनजागृती वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.

घरगुती ग्राहक, सोसायटी आणि रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन यांच्यात योजना समजावून सांगून जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आधीच अर्ज केलेल्या लाभार्थ्यांच्या घरी सौर यंत्रणा लवकरात लवकर बसवण्यासाठी कामाला वेग देण्यात आला आहे.

तपासणी प्रक्रिया जलद करून केंद्र सरकारची सबसिडी वेळेत मिळावी यासाठीही विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच स्थानिक विक्रेत्यांना राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे, जेणेकरून ग्राहकांना योग्य पर्याय निवडता येतील.

या उपक्रमातील कामगिरीच्या आधारे केंद्र सरकार राज्यांचा गौरव करणार आहे. जास्तीत जास्त सौर प्रकल्प सुरू करणे, अर्ज वाढवणे आणि काम वेळेत पूर्ण करणे या निकषांवर राज्यांचे मूल्यमापन होणार आहे.

या मोहिमेमुळे राज्यात सौर ऊर्जेचा वापर वाढेल, वीजबिलात मोठी बचत होईल आणि पर्यावरण संरक्षणालाही बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.