पुण्यात आजोबाकडून 10 वर्षीय नातीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

    06-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे : चाकण आणि नसरापूरमधील धक्कादायक घटनांची धग अजून शांत झालेली नसतानाच पुण्यातील पर्वती परिसरात पुन्हा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका आजोबाने स्वतःच्या अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि.५) घडली. मात्र, स्थानिक नागरिकांच्या जागरूकतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला एका खोलीत नेले. काही वेळाने मुलीच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून शेजारील महिलांना संशय आला. त्यांनी तात्काळ दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता, मुलीची अवस्था संशयास्पद दिसून आली. यानंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करत निषेध नोंदवला. तसेच पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.

दरम्यान, अलीकडेच राज्यातील केज, नसरापूर आणि चाकण येथे अल्पवयीन मुलांवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील ताज्या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.