इंस्टाग्रामवरची ओळख ठरली घातक; नागपुरात लव्ह ट्रायंगलमुळे १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

    06-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाने भीषण रूप धारण करत एका १७ वर्षीय तरुणाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी आणि दोन किशोरांमधील वाढता तणाव, संशय आणि मत्सर यामुळे ही घटना घडल्याचे समोर येत आहे.

कलमना परिसरात घडलेल्या या हत्याकांडामुळे नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर सुरू झालेल्या ओळखीने अखेर रक्तरंजित शेवट गाठला.
कॉलनंतर घराबाहेर पडला, पण परतलाच नाही.

मृत जोहरान मुस्तफा शेख (१७) याला मंगळवारी रात्री इंस्टाग्रामवरून कॉल आला होता. कॉल करणारा युवकही अल्पवयीन असल्याची माहिती आहे. “मित्राला भेटून येतो” असे सांगून जोहरान घराबाहेर पडला, मात्र हीच त्याची शेवटची भेट ठरली.

मैदानात नेऊन प्राणघातक हल्ला-
वाजपेयी नगर येथील अशराफी मशिदीजवळील मैदानात रात्री उशिरा जोहरानवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. डोकं आणि मान यावर वारंवार प्रहार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

प्रेमप्रकरणातून वादाची ठिणगी-
प्राथमिक तपासात एका अल्पवयीन मुलीमुळे दोन्ही किशोरांमध्ये वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे. एकतर्फी प्रेम, संशय आणि वाढत्या तणावातून ही घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल; आरोपी फरार
मृतकाच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अनुराग यादवविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत प्रकरण नोंदवण्यात आले असून आरोपी सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके तयार करण्यात आली आहेत.

सोशल मीडियावरील नात्यांबाबत पुन्हा चिंता-
या घटनेमुळे अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडियावर निर्माण होणाऱ्या नात्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ऑनलाईन ओळखी कधी धोकादायक वळण घेतील, याबाबत पालक आणि समाजाने सजग राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.