
Image Source:(Internet)
तामिळनाडू : राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडत असून सुपरस्टार ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या थलापति विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने पहिल्याच निवडणुकीत दमदार कामगिरी करत सत्तासमीकरणे ढवळून काढली आहेत. सुरुवातीच्या मतमोजणीच्या कलांनुसार, TVKने शंभरहून अधिक जागांवर आघाडी घेत पारंपरिक पक्षांना मोठा धक्का दिला आहे.
२३४ सदस्यीय विधानसभेच्या या निवडणुकीत TVK सुमारे १०० ते १०५ जागांवर आघाडीवर असून बहुमताच्या उंबरठ्याजवळ पोहोचल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील DMK सुमारे ५० जागांवर आघाडीवर आहे, तर AIADMK ७० पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत स्पर्धेत टिकून आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीला DMK आणि AIADMK यांच्यात चुरस दिसत असतानाच पुढील फेऱ्यांमध्ये TVKने जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली. विजय यांच्या एन्ट्रीमुळे तामिळनाडूच्या राजकारणाचे गणितच बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.
वर्षानुवर्षे DMK आणि AIADMK यांच्यातच सत्तास्पर्धा होत असलेल्या राज्यात यावेळी मतदारांनी नव्या पर्यायाला संधी दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे थलापति विजय मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची चर्चा रंगली असून अंतिम निकालानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.