
Image Source:(Internet)
मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांचे नाव सध्या जोरदार चर्चेत असून त्यांच्या नियुक्तीची शक्यता वाढल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या धाडसी आणि प्रभावी कारकिर्दीमुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम नेतृत्व मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादानंतर नव्या अध्यक्षाची निवड महत्त्वाची ठरली असून, या निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
कणखर आणि अनुभवी व्यक्तीची मागणी-
महिला आयोग हा महिलांच्या हक्कांसाठी काम करणारा महत्त्वाचा घटक मानला जातो. अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये थेट हस्तक्षेप करण्याचे अधिकार असल्याने या पदावर अनुभवी, निष्पक्ष आणि ठाम नेतृत्वाची आवश्यकता अधोरेखित केली जात आहे.
मीरा बोरवणकर यांनी पोलीस सेवेत अनेक मोठ्या कारवाया यशस्वीपणे हाताळल्या आहेत. विशेषतः अंडरवर्ल्डविरोधातील मोहिमांमध्ये त्यांनी ठसा उमटवला असून, ‘लेडी सुपरकॉप’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
राजकीय स्तरावर पाठिंबा-
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीच बोरवणकर यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांच्या अनुभवाचा महिला आयोगाच्या कामकाजाला फायदा होईल, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
बोरवणकर कोण?
मीरा बोरवणकर या १९८१ बॅचच्या निवृत्त आयपीएस अधिकारी असून, देशातील धाडसी महिला अधिकाऱ्यांमध्ये त्यांची ओळख आहे. मुंबईतील गुन्हेगारीविरोधी कारवायांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ‘लेडी सिंघम’ म्हणूनही त्या परिचित आहेत.
त्यांना माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्यापासून प्रेरणा मिळाली असून, कुटुंबीय पार्श्वभूमीही प्रशासकीय सेवेशी संबंधित आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.