
Image Source:(Internet)
तिरुवनंतपुरम : केरळ विधानसभा निवडणुकीत मतदारांनी मोठा बदल घडवत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफच्या पारड्यात स्पष्ट बहुमत टाकले आहे. पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीची सलग दहा वर्षांची सत्ता यावेळी संपुष्टात येताना दिसत असून राज्यात सत्तांतर निश्चित झाले आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, १४० सदस्यीय विधानसभेत यूडीएफने शंभरी गाठत बहुमताचा आकडा सहज ओलांडला आहे. त्याउलट एलडीएफची घसरण होत ती मोजक्याच जागांवर आघाडीवर राहिल्याचे चित्र आहे, तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलेले नाही.
या निवडणुकीत काही महत्त्वाच्या लढतींमध्येही यूडीएफने आपली ताकद सिद्ध केली. मनंतवाडी मतदारसंघात उषा विजयन यांनी ठोस आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली. पुथुपल्लीमध्ये चंडी ओमन यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपला बालेकिल्ला कायम ठेवला. ते माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे सुपुत्र आहेत. त्याचबरोबर रमेश चेन्निथला यांनी हरिपाद मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवत पक्षाच्या विजयात मोलाची भर घातली.
एकूणच, केरळमध्ये यावेळी मतदारांनी बदलाला स्पष्ट पाठिंबा देत यूडीएफच्या बाजूने कौल दिला असून, डाव्या आघाडीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या राज्यात झालेला हा सत्तापालट राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.