पश्चिम बंगालमध्ये भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाचा पेच; ‘या’ चार नेत्यांची नावे चर्चेत

    04-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

कोलकाता : राज्यात पहिल्यांदाच सत्ता स्थापनेच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या भाजपसमोर आता मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. प्रचारादरम्यान अमित शहा यांनी “राज्याला बंगाली मुख्यमंत्रीच दिला जाईल” असे स्पष्ट केल्यामुळे स्थानिक नेत्यांची नावे आघाडीवर येत आहेत.

मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे सुवेंदू अधिकारी. पूर्वी ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जाणारे अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाला मोठे बळ दिले. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, राज्यात भाजपचा विस्तार करण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो.

याशिवाय स्वपन दासगुप्ता यांचे नावही चर्चेत आहे. अभ्यासू आणि धोरणात्मक विचारांचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, थेट प्रशासनाचा अनुभव मर्यादित असल्याने त्यांच्या नावावर काही प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, पक्ष संघटना मजबूत करण्यात मोलाची भूमिका बजावणारे दिलीप घोष हेही या शर्यतीतील प्रमुख दावेदार मानले जात आहेत. कठीण काळात पक्षाला उभारी देणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

तसेच, सुकांत मजूमदार यांचे नावही पर्याय म्हणून पुढे येत आहे. उत्तर बंगालमधील प्रभाव, संघटन कौशल्य आणि केंद्रातील अनुभव यामुळे तेही सक्षम दावेदार मानले जात आहेत.

एकंदरीत, पश्चिम बंगालमध्ये भाजपाला सत्ता मिळाल्यास मुख्यमंत्रीपदासाठी अनेक वजनदार नेते शर्यतीत असले, तरी अंतिम निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनच होणार आहे. त्यामुळे या चार नावांपैकी कोणाची निवड होते, किंवा शेवटच्या क्षणी एखादा नवा चेहरा समोर येतो का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.