गुलाल उधळू नका, ‘ही फक्त सुरुवात’; सुनेत्रा अजित पवार यांचा संयमाचा संदेश

    04-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

बारामती: विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी भक्कम आघाडी घेत विजय जवळपास निश्चित केला आहे. मतमोजणीच्या नवव्या फेरीअखेर त्यांची आघाडी इतकी वाढली की निकाल केवळ औपचारिक राहिला आहे.

निकाल स्पष्ट होताच त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत मतदारांचे आभार मानले आणि हा विजय दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतींना अर्पण केला. “दादांच्या आठवणींनी आपण सगळेच भावूक झालो आहोत,” असे त्या म्हणाल्या.

त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करत सांगितले की, विजयाचा आनंद साजरा करताना संयम राखावा. “मिरवणुका, जल्लोष किंवा गुलाल उधळणे टाळा. आपण दादांच्या विचारांनुसार वागूया,” असा त्यांनी संदेश दिला.

पुढील वाटचालीबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “हा शेवट नाही, तर नव्या बारामतीच्या उभारणीची सुरुवात आहे. संघर्ष आणि निर्धाराच्या बळावर आपण दादांचे स्वप्न पूर्ण करू.”

या पोटनिवडणुकीत सुरुवातीपासूनच सुनेत्रा पवार आघाडीवर राहिल्या. नवव्या फेरीपर्यंत त्यांनी ७७ हजार १०३ मतांची आघाडी घेतली असून, हा विजय निर्णायक मानला जात आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी ही निवडणूक पार पडली होती. त्यामुळे राजकीय आणि भावनिक अशा दोन्ही पातळ्यांवर ती महत्त्वाची ठरली. या निकालामुळे बारामतीतील सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व अधिक बळकट झाल्याचे चित्र आहे.