बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार आघाडीवर; मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच स्पष्ट वर्चस्व

    04-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरीअखेर त्या १६,५४३ मतांनी पुढे असून त्यांच्या विजयाचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे चित्र दिसत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली सहानुभूती आणि बारामतीतील पवार कुटुंबाचे पारंपरिक वर्चस्व यामुळे ही निवडणूक विशेष चर्चेत राहिली.

मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली असून संपूर्ण प्रक्रियेसाठी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. सुमारे ३०० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू असून प्रत्येक फेरीनंतर कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढताना दिसत आहे.

निवडणुकीपूर्वी जय पवार यांनी बारामतीत भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता, ज्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले होते. मतदानाच्या दिवशी ग्रामीण व शहरी भागातून मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याने विक्रमी टक्केवारीची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसऱ्या फेरीतील आकडेवारीनुसार, इतर उमेदवारांना अत्यल्प मते मिळाली असून सुनेत्रा पवार यांचे स्पष्ट वर्चस्व कायम आहे.

दरम्यान, राहुरी विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. भाजपचे दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे ही निवडणूक लागली असून त्यांच्या पुत्र अक्षय कर्डिले रिंगणात आहेत. समर्थकांकडून त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त होत असून येथे २७ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे.

बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांचे निकाल राज्याच्या राजकीय दिशेसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.