कर्नाटकमध्ये थरारक सामूहिक हत्याकांड; जमिनीच्या वादातून सहा जणांची निर्घृण हत्या!

    30-May-2026
Total Views |
 सोलापूर सीमाभाग हादरला
Image Source:(Internet)

कर्नाटक : कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यात घडलेल्या एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण सीमाभागात खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्ह्याला लागून असलेल्या नीवरगी गावाजवळ जमिनीच्या जुन्या वादातून सहा जणांची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे विजयपूरसह सोलापूर जिल्हाही हादरून गेला आहे.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत चडचण येथील नीराळे कुटुंबातील पाच सदस्यांसह आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतांमध्ये रेवणसिद्धप्पा नीराळे, दुंडप्पा नीराळे, शिवपुत्र नीराळे, चंद्रशेखर नीराळे, राहुल नीराळे आणि शब्बीर अत्तार यांचा समावेश आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सुमारे २५ एकर शेतजमिनीच्या मालकीहक्कावरून हा रक्तरंजित संघर्ष उफाळून आला. संबंधित जमीन काही महिन्यांपूर्वी नीराळे कुटुंबाने विकत घेतली होती. मात्र या जमिनीवर मागील १५ ते १६ वर्षांपासून वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

शुक्रवारी नीराळे कुटुंबातील सदस्य नव्याने खरेदी केलेल्या शेताची पाहणी करण्यासाठी तसेच झाडाझुडपे साफ करण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत लाकूड व्यवसाय करणारे शब्बीर अत्तारही होते. याचवेळी आरोपींनी अचानक हल्ला चढवत ऊसतोडीसाठी वापरण्यात येणाऱ्या धारदार कोयत्यांनी सपासप वार केले. हल्ला इतका क्रूर होता की सहाही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गोळीबार झाल्याचीही चर्चा आहे. मात्र मृतदेहांच्या प्राथमिक तपासणीत गोळी लागल्याच्या स्पष्ट खुणा आढळल्या नसून, याबाबतचा अंतिम निष्कर्ष शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच विजयपूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे. या सामूहिक हत्याकांडामुळे सीमाभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.