
Image Source:(Internet)
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उरळी कांचन परिसरात घडलेल्या विषारी दारूकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. विषारी दारूच्या सेवनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता २२ वर पोहोचली असून अनेक जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर प्रशासन, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूविक्रीविरोधात मोठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर, पिंपरी-चिंचवड, फुगेवाडी आणि उरळी कांचन परिसरातील अनेक नागरिकांनी गावठी दारूचे सेवन केले होते. त्यानंतर काहींना अंधत्व, मळमळ, उलट्या, उच्च रक्तदाब आणि श्वसनाच्या तक्रारी जाणवू लागल्या. अनेकांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मृतांचा आकडा वाढत जाऊन २२ वर पोहोचला आहे.
उरळी कांचन येथील ३२ वर्षीय रिक्षाचालक उमेश अवचर याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. विषारी दारूचे सेवन केल्यानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली होती. या प्रकरणामुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, विषारी दारू तयार करून विक्री केल्याचा आरोप असलेल्या संशयितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. अवैध दारूचे अड्डे आणि भट्ट्यांवर धडक कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत.
विषारी दारूकांडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुण्यातील विविध भागांतील अवैध दारूभट्ट्यांवर कारवाई करत त्या उद्ध्वस्त केल्या. तर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी फुगेवाडी परिसरात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच शासनानेही बाधित कुटुंबांना मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. अवैध दारू निर्मिती व विक्रीबाबत माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवून तात्काळ कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
या भीषण दारूकांडामुळे अवैध दारूविक्रीचे जाळे, प्रशासनाची देखरेख आणि जबाबदारांवरील कारवाई या मुद्द्यांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.