
Image Source:(Internet)
नागपूर : राज्यात प्रथमच गोवंश तस्करी प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्यात आला आहे. नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्र शासनाने गोवंश तस्करीविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ जणांच्या टोळीवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील भिवापूर आणि कळमेश्वर परिसरातही अशाच दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. या तीनही प्रकरणांमध्ये एकूण २७ आरोपींना मकोकाखाली गुन्हे दाखल करून कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे.
छत्तीसगड-हैदराबाद मार्गावर सुरू असलेल्या गोवंश तस्करीविरोधातील मोहिमेत ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. गोवंश तस्करांवर मकोका लागू करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या कायद्यानुसार गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांवरही कारवाई करता येते. तसेच गुन्हेगारीतून मिळवलेली मालमत्ता जप्त करण्याची तरतूदही या कायद्यात आहे.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील अबुझमाड सीमेवरील कापेवंचा परिसरात पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या शस्त्रनिर्मिती केंद्राचा शोध लावला आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. यावेळी शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले.
कारवाईदरम्यान ग्रेनेड तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, सुमारे ५०० पाईप आणि लघु रॉकेट निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या. आत्मसमर्पणापूर्वी नक्षलवाद्यांनी हे साहित्य जंगलात लपवून ठेवले होते. अशा प्रकारचे साहित्य जप्त होणे सुरक्षा यंत्रणांसाठी महत्त्वाचे असून, ते पूर्णपणे नष्ट केल्यानंतरच संभाव्य धोका कमी होईल, असे पोलिसांचे मत आहे.
यावेळी संदीप पाटील यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण ही सकारात्मक बाब असली तरी त्यांच्या ताब्यातील शस्त्रास्त्रे आणि स्फोटक साहित्यही प्रशासनाकडे जमा होणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे भविष्यातील धोके टाळण्यास मदत होईल.