
Image Source:(Internet
)
नागपूर : शहरातील महाल परिसरातील गजबजलेल्या बाजारपेठेत असलेल्या ‘आशीष एनएक्स’ रेडिमेड कपड्यांच्या शोरूमला शनिवारी सकाळी भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीने काही वेळातच शोरूमचा संपूर्ण मजला आपल्या विळख्यात घेतला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात कपड्यांचा साठा जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास शोरूममधून मोठ्या प्रमाणात धूर निघताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. याची माहिती तातडीने अग्निशमन विभागाला देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन विभागाच्या सात गाड्या आणि जवानांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
आगीची तीव्रता आणि धुराचे प्रचंड प्रमाण यामुळे बचावकार्य करताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे अग्निशमन दलाने शोरूमच्या मागील बाजूची भिंत तोडून आत प्रवेश केला आणि त्यानंतर आग विझविण्याच्या मोहिमेला वेग आला. जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.
घटनेनंतर पोलिसांनी परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवत नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवले. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी आगीचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, आग पूर्णपणे विझल्यानंतर नुकसानग्रस्त मालमत्तेचा पंचनामा करण्यात येणार असून, शोरूममधील मोठ्या प्रमाणावरील कपड्यांचा साठा जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.