-हरित ऊर्जेला मिळणार चालना

Image Source:(Internet)
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपूरातील भांडेवाडी येथे सुरू असलेल्या कचऱ्यापासून सीएनजी निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेत उत्पादन क्षमता, कचरा प्रक्रिया व्यवस्थापन आणि भविष्यातील विस्ताराच्या योजनांचा आढावा घेतला.
शहरातून दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करून त्याचे सीएनजीसारख्या पर्यावरणपूरक इंधनामध्ये रूपांतर करण्याचे काम या प्रकल्पाद्वारे केले जात आहे. यामुळे कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर प्रभावी उपाय मिळण्यासोबतच स्वच्छ ऊर्जेचा पर्यायही उपलब्ध होणार आहे.
पाहणीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत प्रकल्पाचे कार्य अधिक कार्यक्षम करण्यावर भर दिला. तसेच पर्यावरणीय मानकांचे काटेकोर पालन करून प्रकल्पाचे संचालन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी बोलताना फडणवीस यांनी राज्यात स्वच्छता, हरित ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने अशा प्रकल्पांचे महत्त्व अधोरेखित केले. नागपूरमधील हा उपक्रम इतर शहरांसाठीही आदर्श ठरू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.