
Image Source:(Internet)
मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापले असून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 30 मेपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारकडून हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक भूमिका घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या विषयावर सातत्याने चर्चा सुरू असून सरकारकडून काही महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आले आहेत. त्याची माहिती स्वतः जाऊन जरांगे पाटलांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“मी सातत्याने मुख्यमंत्री आणि सहकारी प्रसाद लाड यांच्या संपर्कात आहे. उद्या जरांगे पाटील यांची भेट घेऊन आतापर्यंत झालेल्या चर्चेची आणि सरकारच्या हालचालींची माहिती देणार आहे,” असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अंतरवली सराटीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर नाराजी व्यक्त करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. “30 मेपासून मी आमरण उपोषण सुरू करणार आहे. यावेळी कोणताही मंडप किंवा व्यवस्था नसेल. रणरणत्या उन्हातच बसणार आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सरकारकडून ठोस निर्णय होत नसल्याने संताप व्यक्त करत त्यांनी “मेलो तरी चालेल, पण आता लढा थांबवणार नाही,” अशी आक्रमक भूमिका घेतली. तसेच समाजबांधवांनी अंतरवली सराटीत गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
विखे पाटील आणि जरांगे पाटील यांच्यात उद्या होणारी भेट आता महत्त्वाची मानली जात असून, या चर्चेतून काही सकारात्मक मार्ग निघतो का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.