
Image Source:(Internet)
नागपूर: देशातील वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि आर्थिक परिस्थितीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “सध्या आर्थिक परिस्थिती गंभीर असून नागरिकांनी आपले पैसे सुरक्षित ठेवावेत. मोठ्या गुंतवणुकीपासून सावध राहा,” असा सल्ला त्यांनी दिला.
माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, “देशात पुन्हा लॉकडाऊनसारखी अडचणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे.” बँकिंग व्यवस्थेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त करत “बँकांची परिस्थिती दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे,” असा दावा केला.
महागाईमुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून सरकार केवळ दिखाऊ कार्यक्रमांवर भर देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “जनतेचे मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून फक्त इव्हेंटबाजी सुरू आहे,” अशी टीका त्यांनी केली.
विधानपरिषद निवडणुकीवर भाष्य करताना त्यांनी भाजपमध्ये उमेदवारीवरून अद्याप एकमत नसल्याचे सांगितले. “उमेदवार निश्चित झाल्यानंतरच खरी राजकीय हालचाल दिसेल,” असे ते म्हणाले.
कल्याणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलताना वडेट्टीवार यांनी देशात धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. “जनतेच्या भावना भडकवून राजकारण केले जात आहे,” असेही त्यांनी म्हटले.