
Image Source:(Internet)
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे सोशल मीडियावर रील्समुळे प्रसिद्ध झालेल्या एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहिणी निलेश पाराध्ये (वय 25) असे मृत तरुणीचे नाव असून तिचा मृतदेह हॉटेलच्या स्वयंपाकघरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी हिने हॉटेल ग्रामपंचायतच्या किचनमध्ये लोखंडी अंगलाला दोरी बांधून आत्महत्या केली. ही घटना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. पती निलेश पाराध्ये यांनी याबाबत पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे.
रोहिणी आणि निलेश हे दाम्पत्य विविध सामाजिक विषय आणि खाद्यसंस्कृतीवर आधारित रील्स तयार करत असल्याने सोशल मीडियावर त्यांची मोठी ओळख निर्माण झाली होती. वाढत्या लोकप्रियतेनंतर त्यांनी रत्नागिरी-नागपूर महामार्गावर ब्रह्मपुरी येथे “हॉटेल ग्रामपंचायत” सुरू केले होते. व्यवसाय विस्ताराची तयारी सुरू असतानाच घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेनंतर रोहिणीला तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस पुढील तपास करत आहेत.