नागपुरात क्रीडांचा जल्लोष; खासदार क्रीडा महोत्सवाच्या चौथ्या हंगामाला 31 मेपासून सुरुवात

    28-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरातील युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला खासदार क्रीडा महोत्सवाचा चौथा हंगाम यंदा अधिक दिमाखात पार पडणार आहे. 31 मे ते 7 जून 2026 दरम्यान होणाऱ्या या भव्य स्पर्धांमध्ये सुमारे 23 हजार 800 खेाडू सहभागी होणार असून 18 विविध क्रीडा प्रकारांमध्ये रंगतदार सामने पाहायला मिळणार आहेत. विजेत्यांसाठी तब्बल 57 लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि माजी आमदार संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. “खेळो नागपूर खेलो” या घोषवाक्याखाली शहरातील 20 विविध मैदानांवर स्पर्धा पार पडणार असून युवकांमध्ये क्रीडाप्रेम वाढवणे आणि स्थानिक प्रतिभेला व्यासपीठ देणे हा उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

31 मे रोजी यशवंत स्टेडियम येथे महोत्सवाचे शानदार उद्घाटन होणार असून बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी हे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानिमित्त “रन नागपूर रन” मॅरेथॉनचेही आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे.

या वर्षी योगासन, खो-खो, अॅथलेटिक्स, कॅरम, रोलर स्केटिंग, बेंच प्रेस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, हँडबॉल, सॉफ्टबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती, कबड्डी आणि जलतरण अशा विविध खेळांचा समावेश करण्यात आला आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून वरिष्ठ गटांपर्यंत सर्व वयोगटातील खेळाडूंना या स्पर्धांमध्ये सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.