नागपुरात उकाड्याने जीव हैराण; उद्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

    28-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरासह संपूर्ण विदर्भात उष्णतेचा तडाखा अजूनही कायम असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अशातच हवामान विभागाने शुक्रवार (29 मे) साठी नागपूरकरांना महत्त्वाचा इशारा दिला आहे. शहरात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तसेच जोरदार वारेही वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

नागपुरात गुरुवारी 45.7 अंश सेल्सिअस इतक्या उच्च तापमानाची नोंद झाली. त्यामुळे दुपारच्या सुमारास शहरातील रस्ते ओस पडले होते. सतत वाढणाऱ्या तापमानामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

हवामान खात्याने नागपूरसह अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काही भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, वातावरणातील वाढती आर्द्रता आणि मान्सूनपूर्व स्थितीमुळे विदर्भातील हवामानात अचानक बदल होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुढील काही दिवसांत उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.