
Image Source:(Internet)
नागपूर : कळमना भागात दोन मित्रांमधील वादाने भीषण वळण घेत एका तरुणाचा जीव गेला. टेरेसवर झोपलेल्या मित्राच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून कळमना पोलिसांनी आरोपीला 24 तासांच्या आत अटक केली आहे.
मृतक दीपक उर्फ भोला भुजबल चंद्रलेख (22) हा विजयनगर परिसरात राहत होता, तर आरोपी अमोल लक्ष्मण वाघमारे (31) हा कळमना गावातील रहिवासी आहे. दोघेही नेहमी सोबत फिरत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. बुधवारी रात्री त्यांनी एकत्र जेवण केले आणि त्यानंतर घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेले.
पहाटे अचानक दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात अमोलने जवळ पडलेला दगड उचलून दीपकच्या डोक्यावर वार केले. गंभीर मार लागल्याने दीपकचा जागीच मृत्यू झाला. सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून परिसरात एकच खळबळ उडाली.
माहिती मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक आणि प्राथमिक चौकशीच्या आधारे अमोल वाघमारे याला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.