
Image Source:(Internet)
पुणे: राज्यात सुरू असलेल्या जनगणना कामादरम्यान आणखी एका शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथे जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात असताना शिक्षिका दीपाली तांबे यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. भरधाव डंपरने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
उन्हाळ्याच्या सुट्टीतही शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी दारोदारी फिरावे लागत असल्याने आधीच नाराजीचे वातावरण आहे. त्यातच सलग चौथ्या शिक्षकाचा मृत्यू झाल्याने शिक्षक संघटनांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “शिक्षकांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
मृत शिक्षिका दीपाली तांबे या जनगणना कामासाठी बाहेर पडल्या होत्या. जुना पुणे-मुंबई महामार्गावरील कान्हे फाटा परिसरात भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शिक्षक संघटनांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
यापूर्वीही जनगणना काम करताना राज्यातील तीन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूरचे भगवान पाटील आणि सांगोल्यातील राजाराम ढोले यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता, तर लातूरचे सुंदरम वांगसकर यांचा अपघातात मृत्यू झाला होता. आता दीपाली तांबे यांच्या मृत्यूमुळे हा आकडा चारवर पोहोचला आहे.
दरम्यान, जनगणना कामादरम्यान मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान आणि अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. कोल्हापूर खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोरे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे.