विधानपरिषदेत भाजपची मजबूत पकड; महायुतीत ‘मोठ्या भावाची’ भूमिका आणखी भक्कम

    27-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधानपरिषद निवडणुकांची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीत जागावाटपावर चर्चा सुरू असताना नागपूर मतदारसंघातील आकडेवारीने भाजपची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

नागपूर विधानपरिषद मतदारसंघात एकूण ७९४ मतांपैकी तब्बल ५०१ मते भाजपच्या बाजूने आहेत. तुलनेत शिंदे गटाच्या शिवसेनेकडे ३० तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे केवळ ५ मते असल्याने येथे भाजपचे वर्चस्व स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे नागपूरची जागा भाजपच्या खात्यात जाणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

विदर्भातही भाजपची स्थिती मजबूत असून भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली आणि अमरावतीसारख्या मतदारसंघांमध्येही भाजप आघाडीवर आहे. राज्यातील १७ पैकी १४ मतदारसंघांत भाजपकडे निर्णायक संख्या असल्यामुळे महायुतीमध्ये भाजपची भूमिका अधिक प्रभावी ठरताना दिसत आहे.

दरम्यान, जागावाटपाबाबत अंतिम निर्णय अद्याप बाकी असला तरी नागपूरसह अनेक महत्त्वाच्या जागांवर भाजपची दावेदारी सर्वाधिक मजबूत मानली जात आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी महायुतीत समन्वयाने निर्णय घेतला जाईल, असे संकेत दिले आहेत।