‘नीट’ प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचा केंद्रावर हल्लाबोल; “शिक्षणमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारावी”

    22-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : ‘नीट’ परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि राज्यातील विविध प्रश्नांवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. परीक्षा व्यवस्थेतील सातत्याने उघड होत असलेल्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या काही वर्षांत देशभरातील अनेक भरती आणि प्रवेश परीक्षांचे पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र सरकार या गंभीर विषयावर प्रभावी उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टाचारामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असल्याचेही ते म्हणाले.

‘नीट’ घोटाळ्यात काँग्रेस नेत्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. काही जुन्या राजकीय वक्तव्यांचा चुकीचा अर्थ लावून विरोधकांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार पूर्णपणे संवेदनाहीन असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शेतकरी प्रश्नांवर बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कर्जमाफीची घोषणा होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. इंधनटंचाईमुळे शेतीची कामे प्रभावित होत असून खतांच्या उपलब्धतेबाबतही शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशातील आर्थिक स्थितीवर टीका करताना त्यांनी औद्योगिक गुंतवणूक घटत असल्याचा दावा केला. बेरोजगारीच्या प्रश्नावरही त्यांनी सरकारला धारेवर धरत, तरुणांना रोजगार हवा आहे; धार्मिक वाद नव्हेत, असे स्पष्ट केले. सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या युवकांवर दबाव टाकला जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.

राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना वडेट्टीवार यांनी महायुतीत अंतर्गत नाराजी वाढत असल्याचे सांगितले. काही सहयोगी पक्षांमध्ये अस्वस्थता असून आगामी काळात त्याचे परिणाम दिसू शकतात, असे ते म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत त्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.