चंद्रपूरात वाघाचा थरारक हल्ला; तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या ४ महिलांचा मृत्यू, परिसरात भीतीचे सावट

    22-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू असल्याने स्थानिक महिला मोठ्या प्रमाणात जंगलात कामासाठी जात आहेत. शुक्रवारी पहाटे गुंजेवाही गावातील काही महिला नेहमीप्रमाणे तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. मात्र सकाळच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला.

या हल्ल्यात महिलांना कोणताही बचाव करण्याची संधी मिळाली नाही. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वाघाने अत्यंत आक्रमकपणे हल्ला करत काही क्षणांतच चारही महिलांना ठार केले. या घटनेनंतर जंगल परिसरात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे. मृत महिलांची ओळख पटली असून त्यांची नावे कवडूबाई दादाजी मोहुर्ले (45), अनुबाई दादाजी मोहुर्ले (46), संगीता संतोष चौधरी (36) आणि सुनीता कौशिक मोहुर्ले (33) अशी आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली असून वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. वनविभागाने नागरिकांना जंगलात जाताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले असून संबंधित परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. तेंदूपत्ता हंगामादरम्यान वाढत चाललेला मानव–वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा गंभीर स्वरूपात समोर आला आहे.