सावधान! ‘या’ गोष्टी केल्या नाहीत तर मतदार यादीतून नाव होऊ शकते गायब

    22-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने विशेष पुनरिक्षण मोहीम सुरू केली असून, नागरिकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत बीएलओ अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळणार आहेत. आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास मतदार यादीतील नावावर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही आयोगाने दिला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, मतदारांना आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने आपले नाव मतदार यादीत तपासता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ निवडून माहिती शोधण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मतदान केंद्राची माहिती नसली तरी मतदारसंघाच्या आधारे नाव शोधता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विशेष पुनरिक्षण मोहिमेदरम्यान मतदार गणना फॉर्म भरणे आणि सादर करण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. नागरिकांनी आपला बुथ क्रमांक, मतदारसंघ आणि यादीतील अनुक्रमांक आधीच तयार ठेवावा, जेणेकरून बीएलओ अधिकाऱ्यांना प्रक्रिया लवकर पूर्ण करता येईल.

३० जूनपर्यंत बीएलओ अधिकारी नागरिकांच्या घरी भेट देणार आहेत. यावेळी आवश्यक माहिती किंवा कागदपत्रे उपलब्ध नसल्यास आयोगाने मान्य केलेल्या कागदपत्रांपैकी कोणताही एक पुरावा सादर करावा लागणार आहे. नागरिकत्व आणि जन्मतारीख दर्शवणारे पुरावे महत्त्वाचे मानले जाणार आहेत.

आयोगाने असेही स्पष्ट केले की, आधीची माहिती योग्यरीत्या नोंदलेली असल्यास अतिरिक्त कागदपत्रांची गरज भासणार नाही. मात्र नाव, आडनाव किंवा इतर तपशीलांमध्ये बदल असल्यास संबंधित पुरावे द्यावे लागतील. उदाहरणार्थ, विवाहानंतर आडनाव बदलल्यास विवाहपत्रिका ग्राह्य धरली जाईल.

एखादी व्यक्ती गावाबाहेर असल्यास तिच्या वतीने कुटुंबातील सदस्य सही करू शकतील, अशी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर एखाद्याचे नाव प्रारूप मतदार यादीत दिसत नसेल, तरी त्यांचा मतदानाचा अधिकार तात्काळ रद्द होणार नाही. त्यासाठी फॉर्म क्रमांक ६ भरून पुन्हा नोंदणी करता येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी सर्व राजकीय पक्षांना देखील बीएलओ अधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवण्यासाठी प्रतिनिधी नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.