नागपूरमध्ये गुन्हेगारीचा कहर;लश्करीबागमध्ये वृद्ध महिलेची निर्घृण हत्या, पोलिसांसमोर वाढते आव्हान

    22-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारी घटनांनी नागरिकांची चिंता वाढवली आहे. अवघ्या सहा दिवसांच्या कालावधीत पाच खुनांच्या घटनांनी शहर हादरून गेले असून कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. किरकोळ वाद, कौटुंबिक तणाव, आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक शत्रुत्वातून रक्तरंजित घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताज्या घटनेत पंचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लश्करीबाग परिसरात ६५ वर्षीय इंदू चौहान यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. चौहान या पतीसोबत राहत होत्या. घरामध्येच झालेल्या या हत्येमुळे स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पंचपावली पोलिसांसह गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांनी घरातील परिस्थिती, नातेवाईकांशी संबंध आणि आर्थिक व्यवहार यांचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत ओळखीच्या व्यक्तीकडूनच हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

सलग खुनांनी नागपूर हादरले
गेल्या काही दिवसांपासून शहरात घडणाऱ्या हत्यांच्या मालिकेमुळे नागपूरकरांमध्ये भीती वाढली आहे.
१५ मे रोजी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुंड्याच्या कारणावरून विवाहितेचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात पतीसह कुटुंबीयांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

त्यानंतर १६ मे रोजी गिट्टीखदान परिसरात लोन एजंट अजय श्रीवास यांची भरदिवसा हत्या करण्यात आली. वैयक्तिक संबंधातून हा कट रचल्याची माहिती तपासात समोर आली.

१७ मे रोजी एमआयडीसी परिसरात एका मजुराची त्याच्याच सहकाऱ्यांनी हत्या केल्याची घटना घडली. या सलग घटनांनंतर आता लश्करीबागमधील वृद्ध महिलेच्या खुनामुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत चिंता अधिक गडद झाली आहे.

पोलिसांचा बंदोबस्त वाढला, तरी नागरिकांमध्ये भीती कायम-
वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना रात्रीची गस्त वाढवण्याचे आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

मात्र, सलग घडणाऱ्या हत्या आणि हिंसक घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढत असून “नागपुरात गुन्हेगारांना कायद्याची भीती उरली आहे का?” असा सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. नागपूर पोलिसांसमोर शहरात पुन्हा सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.