धोकादायक वृक्षाबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने घेतली नाही दखल

Image Source:(Internet)
नागपूर : अंबाझरी तलाव मार्गावर शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. घाटे रेस्टॉरंटजवळ रस्त्यालगत उभा असलेला एक विशाल वृक्ष अचानक जमीनदोस्त झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घटना घडली त्या वेळी रस्त्यावर वाहनांची आणि नागरिकांची मोठी ये-जा सुरू असल्याने मोठा अनर्थ थोडक्यात टळल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.
स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित वृक्ष बराच काळ धोकादायक अवस्थेत होता. तो कधीही कोसळू शकतो, अशी भीती नागरिकांनी अनेकदा व्यक्त केली होती. याबाबत संबंधित विभागाला वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही प्रशासनाने वेळेत कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, वृक्ष कोसळताना मोठा आवाज झाला आणि काही क्षण परिसरात घबराट पसरली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनचालक आणि पादचारी काही काळ भयभीत झाले होते. जर त्या क्षणी रस्त्यावर अधिक गर्दी असती, तर गंभीर दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.
घटनेनंतर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. माहिती मिळताच संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि पडलेला वृक्ष हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम हाती घेतले.
या घटनेनंतर प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शहरातील धोकादायक वृक्षांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, मान्सूनपूर्व तपासणी आणि उपाययोजनांची मागणी जोर धरू लागली आहे.