
Image Source:(Internet)
नागपूर : सध्या सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या डिजिटल मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवणाऱ्या या प्लॅटफॉर्मचे ‘X’वरील अधिकृत अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून नेमकं कारण काय, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
अवघ्या काही दिवसांत या अकाउंटने इन्स्टाग्रामवर तब्बल १३ दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा पार केला. सोशल मीडियावरील या वेगवान वाढीमुळे अनेक राजकीय पक्षांच्या अधिकृत पानांनाही मागे टाकल्याची चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे तरुण वर्गाकडून या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, अचानक ‘X’ अकाउंट ब्लॉक झाल्यानंतर संस्थापकांनी यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, इन्स्टाग्राम अकाउंटवरही कारवाई करण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र ते शक्य न झाल्याने अखेर ‘X’वरील हँडलवर बंदी घालण्यात आली.
या प्रकरणावर बोलताना संस्थापकांनी सांगितले की, ही मोहीम अचानक सुरू झाली असली तरी त्यामागे तरुणांच्या भावना आणि असंतोष मोठ्या प्रमाणात जोडला गेला आहे. पुढील काळात देशभरातील युवकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि नाराजी समजून घेण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना त्यांनी लोकशाही व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले. देशातील राजकीय वातावरण बदलत असून सामान्य नागरिकांच्या आवाजाला मर्यादा घालण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका त्यांनी केली. त्यामुळे येत्या काळात ही डिजिटल चळवळ आणखी मोठे स्वरूप धारण करू शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.