
Image Source:(Internet)
नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीरमधून (POK) एक मोठी बातमी समोर आली असून, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कथित मास्टरमाइंड हमजा बुरहान याचा खात्मा करण्यात आला आहे. मुजफ्फराबादमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात हमजा बुरहान जागीच ठार झाला.
हमजा बुरहान हा दहशतवादी संघटना ‘अल बदर’चा प्रमुख मानला जात होता. पाकिस्तानमध्ये बसून त्याने भारताविरोधात अनेक दहशतवादी कारवायांचे नियोजन केल्याचा आरोप होता. २०१९ मध्ये झालेल्या भीषण पुलवामा हल्ल्यामागेही त्याचा मोठा हात असल्याचे सांगितले जात होते.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात CRPF चे ४० जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. भारताने त्यानंतर बालाकोट एअर स्ट्राईक करत दहशतवादी तळांवर कारवाई केली होती.
दरम्यान, हमजा बुरहानच्या हत्येनंतर POK मध्ये खळबळ उडाली असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हल्लेखोर कोण होते आणि हत्येमागचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.