शेअर बाजारात जोरदार उसळी;सेन्सेक्स ५५० अंकांनी वधारला, निफ्टी २३,८०० च्या वर!

    21-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून दबावाखाली असलेल्या भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी (दि. २१) दमदार पुनरागमन केले. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेली सुधारणा यामुळे सकाळपासूनच गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी दिसून आली.

सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स तब्बल ५५० अंकांनी वधारत ७५,८०० च्या पुढे गेला. तर एनएसईचा निफ्टी-५० निर्देशांकही १४८ अंकांच्या वाढीसह २३,८०० चा टप्पा पार करत मजबूत व्यवहार करत होता. बाजारात रिअल्टी, पॉवर, कॅपिटल गुड्स आणि सेवा क्षेत्रातील शेअर्समध्ये विशेष तेजी नोंदवली गेली.

रुपयालाही बळकटी-

गेल्या सत्रात डॉलरच्या तुलनेत ९६.८२ या नीचांकी पातळीवर घसरलेला रुपया गुरुवारी सावरला. रुपया ९६.३० वर उघडल्याने चलन बाजारालाही स्थैर्य मिळाल्याचे चित्र दिसले. कच्च्या तेलाच्या किमतीतील घट आणि जागतिक तणाव काहीसा कमी झाल्यामुळे रुपयाला आधार मिळाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला-
बाजारातील अस्थिरता मोजणारा ‘India VIX’ निर्देशांक सुमारे ४ टक्क्यांनी घसरला आहे. यामुळे गुंतवणूकदारांमधील भीती कमी होऊन बाजारात स्थैर्याची चिन्हे दिसत आहेत. इराणशी संबंधित भू-राजकीय तणावही तूर्तास कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.

एकूणच, मजबूत खरेदी आणि सुधारलेल्या जागतिक परिस्थितीमुळे बाजारात पुन्हा तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.