बंगळुरु विमानतळावर मोठा अपघात टळला; एअर इंडियाच्या विमानाची रनवेला धडक, १७९ प्रवासी थरारले

    21-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

बंगळुरु : दिल्लीहून बंगळुरुकडे जाणाऱ्या Air India च्या विमानासोबत मोठी दुर्घटना घडता घडता टळली. बंगळुरु विमानतळावर लँडिंग करताना AI2651 या फ्लाइटला ‘टेल-स्ट्राईक’चा फटका बसला. लँडिंगदरम्यान विमानाचा मागील खालचा भाग थेट रनवेला घासला गेला. मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि विमान सुरक्षितपणे उतरवण्यात यश आले.

या विमानात तब्बल १७९ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. घटनेनंतर काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला.

माहितीनुसार, विमान लँडिंगसाठी खाली येत असताना काही वेळ आधी उड्डाण घेतलेल्या दुसऱ्या विमानामुळे निर्माण झालेल्या ‘वेक टर्ब्युलन्स’चा फटका एअर इंडियाच्या विमानाला बसला. हवेत निर्माण झालेल्या तीव्र दाब आणि हवेच्या लाटांमुळे विमानाचे संतुलन काही क्षण बिघडले आणि शेपटीचा भाग रनवेला घासला गेला.

स्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच पायलटने तत्काळ ‘गो-अराउंड’ प्रक्रिया सुरू केली. म्हणजेच लँडिंग अर्धवट सोडून विमानाला पुन्हा हवेत घेऊन नियंत्रित पद्धतीने दुसऱ्यांदा लँड करण्यात आले. यामुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याचे सांगितले जात आहे.

घटनेनंतर संबंधित विमान तातडीने तपासणीसाठी ग्राऊंड करण्यात आले आहे. या प्रकारामुळे बंगळुरूहून दिल्लीला जाणारी AI2652 फ्लाइट रद्द करण्यात आली. प्रभावित प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत असून विमानतळावरील एअर इंडियाची टीम मदतकार्य करत आहे.

दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून सर्व प्रक्रिया सरकारी विमान सुरक्षा नियमांनुसार पार पडणार असल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली असून प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे म्हटले आहे.

काय असतो ‘टेल-स्ट्राईक’?
विमान टेकऑफ, लँडिंग किंवा ‘गो-अराउंड’ प्रक्रियेदरम्यान विशिष्ट कोनात झुकल्यास त्याचा मागील भाग रनवेला स्पर्श करतो. यालाच ‘टेल-स्ट्राईक’ म्हटले जाते. अशा घटनांमुळे विमानाचे संतुलन बिघडण्याचा किंवा रनवेबाहेर जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.