
Image Source:(Internet)
मुंबई : बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण ठरलं ते म्हणजे मध्यरात्री मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाबाहेर घडलेला प्रकार. रुग्णालयापर्यंत सतत पाठलाग करणाऱ्या पॅपाराझींवर सलमान खान चांगलाच संतापल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान मध्यरात्री हिंदुजा रुग्णालयात गेला असताना काही फोटोग्राफर्सनी त्याच्या गाडीचा पाठलाग केला. ट्रॅफिक सिग्नलपासून ते थेट रुग्णालयाबाहेरपर्यंत सलमानचा फोटो आणि व्हिडीओ घेण्यासाठी पॅपाराझींनी गर्दी केली. रुग्णालयातून बाहेर पडताच “भाई-भाई” अशा हाका मारत त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे संतप्त झालेल्या सलमाननं, “हे हॉस्पिटल आहे, शांत बसा,” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.
या घटनेनंतर सलमान खाननं पहाटे सोशल मीडियावर सलग चार पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला. “मी नेहमीच मीडियाला साथ दिली, फोटोग्राफर्सचाही विचार केला. पण एखाद्याच्या कठीण प्रसंगात त्याचा पाठलाग करून त्यातून मजा घेणं चुकीचं आहे,” असं त्यानं म्हटलं.
त्याचबरोबर सलमाननं इशाराही दिला. “मी वयाच्या साठीत आलोय, पण लढायचं अजून विसरलो नाही. आजही 100 जणांना लोळवू शकतो,” अशा शब्दांत त्यानं संताप व्यक्त केला. “तुमच्या कुटुंबातील कुणी हॉस्पिटलमध्ये असेल, तर तुम्हालाही असंच वागणं आवडेल का?” असा सवालही त्यानं पॅपाराझींना केला.
सलमान खानच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर दोन गट पडले असून, काहींनी त्याच्या भावना योग्य असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी सेलिब्रिटींनी संयम ठेवण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान, सलमानचा हा व्हिडीओ आणि पोस्ट्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.