रत्नागिरी हादरलं! जंगल परिसरात २५ जिवंत स्फोटके आढळल्याने खळबळ; महिला गंभीर जखमी

    20-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

रत्नागिरी : कोकणातील शांत समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. जांभरी फाटा परिसरातील जंगलात तब्बल २५ जिवंत बॉम्ब आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत एका महिलेचा स्फोटात गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, जांभरी फाटा येथील काही महिला मंगळवारी सकाळी चुलीसाठी सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. यावेळी झुडपांमध्ये त्यांना संशयास्पद वस्तू दिसली. त्यापैकी एका महिलेने ती वस्तू हातात घेताच अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण जंगल परिसर सील करून स्निफर डॉग आणि मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान झुडपांमध्ये लपवून ठेवलेली २० ते २५ जिवंत स्फोटके पोलिसांना आढळून आली.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून सुरक्षेच्या दृष्टीने जांभरी फाटा परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले असून स्फोटके निकामी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्राथमिक तपासात ही स्फोटके रानडुक्कर किंवा वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी वापरण्यात येत असावीत, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, यामागे इतर कोणता गुन्हेगारी कट आहे का, याचाही पोलीस सखोल तपास करत आहेत.