
Image Source:(Internet)
मुंबई : ऑनलाइन औषध विक्री आणि ई-फार्मसी कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात आज देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंदची हाक दिली आहे. ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स’ (AIOCD) च्या नेतृत्वाखाली होत असलेल्या या आंदोलनात देशातील तब्बल 12.5 लाखांहून अधिक केमिस्ट आणि औषध वितरक सहभागी होण्याची शक्यता आहे.
या बंदमुळे मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील अनेक शहरांमध्ये मेडिकल दुकाने बंद राहणार असून, मुंबई परिसरातील सुमारे 7 ते 8 हजार मेडिकल्सवर परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
औषध विक्रेत्यांच्या संघटनांचा आरोप आहे की, अनेक ऑनलाइन फार्मसी कंपन्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची योग्य पडताळणी न करता औषधांची विक्री करत आहेत. शिवाय मोठ्या सवलती देऊन ग्राहकांना आकर्षित केले जात असल्याने छोट्या आणि मध्यम मेडिकल व्यावसायिकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
Maharashtra State Chemists and Druggists Association चे सरचिटणीस अनिल नावंदर यांनी सांगितले की, ऑनलाइन औषध विक्रीसाठी अद्याप स्पष्ट कायदा अस्तित्वात नसतानाही काही ई-फार्मसी कंपन्या नियमांचा गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे पारंपरिक मेडिकल व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे.
दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) सतर्क झाले असून, नागरिकांना औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रुग्णालयांशी संलग्न मेडिकल्स, 24 तास सुरू असलेली औषध दुकाने आणि काही निवडक मेडिकल्स सुरू ठेवण्यात येणार आहेत.
मुंबईतील विविध विभागांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊन औषधांचा अतिरिक्त साठा करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच आपत्कालीन सेवांसाठी आवश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.