प्रसाद लाडांना मनोज जरांगेंचं चर्चेचं निमंत्रण; 23 तारखेपर्यंत निर्णयाची अपेक्षा

    20-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना अंतरवाली येथे चर्चेसाठी येण्याचं निमंत्रण दिलं आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक भूमिका घेत असेल, तर आंदोलन करण्याची गरज नसल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले. तसेच गावागावांत सुरू असलेल्या बैठका 23 मेपर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी 30 मेपासून आमरण उपोषण करण्याची घोषणा जरांगे यांनी यापूर्वीच केली आहे. दरम्यान, सरकार चर्चेतून मार्ग काढण्याच्या तयारीत असून मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे वक्तव्य प्रसाद लाड यांनी माध्यमांशी बोलताना केले होते. त्यानंतर जरांगे यांनी त्यांना थेट अंतरवाली येथे येऊन चर्चा करण्याचं निमंत्रण दिलं.

“आम्ही सरकारविरोधात नाही. सरकारने समाजाच्या मागण्या मान्य केल्या तर आंदोलनाची गरज भासणार नाही. मात्र 23 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांकडून सर्व मागण्यांची मंजुरी घेऊन अंतरवाली येथे यावं,” असं आवाहन जरांगे यांनी केलं.

यावेळी त्यांनी सरकारला आणि सत्ताधाऱ्यांना इशाराही दिला. “आमच्याशी दगा-फटका करू नका. आम्ही सहसा कुणालाही बोलावत नाही. तुम्हाला निमंत्रण दिलं आहे, त्यामुळे समाजाच्या भावना समजून घ्या,” असे स्पष्ट शब्दांत जरांगे म्हणाले.

दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा निघतो का आणि सरकार कोणती भूमिका घेते, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.